आंदोलकांचे व्हिडिओ पाहायला वेळ नाही; सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये ! पोलीस कारवाईवर तत्काळ सुनावणीस सुप्रीम कोर्टाचा नकार

Foto
नवी दिल्ली : नीट पेपरफुटी, शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षेतील गैरप्रकारांप्रकरणी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, यासाठी  कॉक्रोच जनता पार्टीसह हजारे विद्यार्थ्यांनी संसदेवर मोर्चा नेला होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधुरांचा वापर करत कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी केलेल्या या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. परंतु, तत्काळ सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट नकार दिला. 

याचिका दाखल करणार्‍या वकिलाने सर्वोच्च न्यायालयाला दिल्ली पोलिसांच्या हल्ल्याचा व्हिडिओ पाहून या प्रकरणाची दखल घेण्याची विनंती केली होती. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्टपणे सांगितले की, व्हिडिओ पाहण्यासाठी न्यायालयाकडे वेळ नाही. न्यायालयाचा आणि स्वतःचा वेळ वाया घालवू नये, असेही सर्वोच्च न्यायालयाने यावेळी म्हटल्याचे सांगितले जात आहे. 

एका वकिलाने सर्वोच्च न्यायालयात आंदोलकांवरील पोलीस कारवाईचा मुद्दा उपस्थित करत माहिती दिली की, पोलिसांनी आंदोलन करणार्‍या विद्यार्थ्यांवर बळाचा वापर केला होता आणि त्याचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की, त्यांनी स्वतः ते व्हिडिओ पाहावेत आणि या प्रकरणाची स्वतःहून दखल घ्यावी. यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी वकिलाला मध्येच थांबवले आणि सांगितले की, आम्हाला व्हिडिओ पाहण्यात रस नाही. आमच्याकडे व्हिडिओ पाहण्यासाठी वेळ नाही. सर्वोच्च न्यायालयाचा वेळ वाया घालवू नये, असा सल्ला सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी दिला.

दरम्यान, वकिलांनी स्पष्ट केले की, आंदोलन करणारे विद्यार्थी नीट () परीक्षेचे योग्य आयोजन आणि राष्ट्रीय चाचणी संस्थेमधील सुधारणा यांसारखे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करत आहेत. भविष्यातील अनियमितता टाळण्यासाठी परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याची त्यांची मागणी आहे.